एक होती चेटकीण...
एक होती चेटकीण- Marathi Ghost Stories
यात तिचा काही दोष नव्हता, असंच कुणालाही वाटलं असतं. पण तिचे हात रक्ताने माखलेले होते. तिच्या ओठांवर पसरलेलं रक्त पाहून असं वाटत होतं जणू तिने एखाद्या ड्रॅक्यूला प्रमाणे त्याचं रक्त पिण्याचा प्रयत्न केला असावा. तिचा तो अवतार भयाण असाच होता. पोलिस सुद्धा हैराण झाले होते. हे असलं दृश्य त्यांनी त्यांच्या उभ्या आयुष्यात कधी पाहिलं नसावं. तुम्ही जर हे दृश्य पाहिलं असतं तर तुमचा थरकाप उडाला असता. ही दहा वर्षांची चिमुरडी एखाद्या चेटकीणी सारखी भासत होती. तिची नजर अगदी स्तब्ध होती. महिला हवालदार तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होती. पण ती हू नाही की चू नाही. केवळ शून्यात पाहत होती. काय घडलं असेल आदल्या रात्री? हे जाणून घेण्याची सर्वांनाच उत्सुकता होती. तिचं नाव शाल्मली. अनूज सातारकर आणि सविता सातारकर यांची कन्या. सविताने शाल्मलीला या अवस्थेत पाहिलं तेव्हापासून ती धक्क्यातून सावरलेली नाही. कसंबसं तिने दार लावून घेतलं आणि पोलिसांना फोन केला. शाल्मली लहानपणापासूनच जरा विचित्र वागत असे. पण ती शारीरिक आणि मानसिक रितीने सुदृढ आहे, असं डॉक्टरांचं म्हणणं होतं. तिला इतर मुलांप्रमाणे खेळायला आवडत नाही. चॉकलेट्स, बिस्किट्स, कार्टून्समध्ये तिचं मन रमत नाही. पण ती अभ्यासात वगैरे बर्यापैकी हुशार आहे. तिचं दैनंदिन आयुष्यही व्यवस्थित आहे. तरीही लहान मुलांच्या चेहर्यावर जी निरागसता असते, ती निरागसता तिच्यात कधीच नव्हती.
तिची आई सविता ही पुर्वायुष्यात साधारण अशीच होती असं म्हटलं जातं. तिचे वडील लहानपणीच वारले. मग घर चालवण्यासाठी तिच्या आईने अगदीच वेगळा मार्ग स्वीकारला. धन्याढ्य पुरुषांना आपल्या यौवनाच्या जाळ्यात ओढायचं आणि त्यांना आनंदी ठेवून पैसे मिळवत राहायचे. त्यामुळे सविताच्या मनावर विपरित परिणाम झाला होता. आता जशी शाल्मली एकलकोंडी वाटते तशीच तिची आई सुद्धा एकटीच राहत असे. कुणाच्यात मिसळत नसे. सविताने आपल्या आईला अनेक पुरुषांसोबत पाहिलं होतं. सगळे पुरुष आपल्या आईला काहीतरी इजा करत आहेत असं तिला वाटू लागलं. थोडक्यात सांगायचं तर तिला स्त्री-पुरुष संबंधाविषयी घृणा वाटू लागली. ती हळू हळू मोठी होऊ लागली. आता तिने कॉलेज जीवनात प्रवेश केला होता. सविताची आई फार सुंदर होती. तेच सौंदर्य सविताला प्राप्त झालं होतं. तिला पाहता क्षणी स्खलन व्हावं इतकी ती मादक होती. मधाळ जणू रती...
कॉलेज जीवनात प्रवेश केल्यावर तिच्या सौंदर्यावर घायाळ होणारे अनेक जण होते. तिच्या आईची पार्श्वभूमी अनेकांना माहित होती. म्हणून तिच्याकडे पाहताना लोक त्याच नजरेने पाहायचे. मुलंही तिला छेडायची. पण ती मान खाली घालून राहत असे. त्या कॉलेजमध्ये एक तरुण प्राध्यापिका होती. तिला या मुलीची खुप दया येत असे. त्या प्राध्यापिकेचे नाव शर्वरी. शर्वरीला प्रश्न पडायचा की ही मुलगी इतकी एकलकोंडी कशी? नेमकं काय भोगलं असेल हिने? शर्वरी सवितामध्ये स्वतःला पाहू लागली. तिने सुरुवतीला सविताशी बोलण्याचा, मैत्री करण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. सविताला कुणाशीही मैत्री करायची नव्हती. पण शर्वरीने प्रयत्न सोडले नाही. एकदा एक मुलगा सविताच्या खुपच मागे लागला होता. रात्री अपरात्री तिला फोन करुन, मेसेज करुन त्रास देत होता. सविता खुप घाबरलेली असायची. शर्वरीने हे ओळखलं आणि सविताच्या तोंडून वदवून घेतलं. शर्वरीला जेव्हा कळलं की एक मुलगा तिला त्रास देतोय. तेव्हा शर्वरीने सविता समोर त्या मुलाचा समाचार घेतला. अगदी त्याला प्रिन्सीपॉल समोर उभं केलं. ते प्रकरण तिकडेच शमलं. पण एक नवीन प्रकरण सुरु झालं.
शर्वरी आणि सविता खुपच चांगल्या मैत्रीणी झाल्या. सविता शर्वरीच्या घरी जाऊ लागली. शर्वरी घरी एकटीच राहायची. ती दिसायचीही विलक्षण. म्हणजे ती सुंदर होती, आकर्षक होती यात शंका नाही. इतरांना तिच्याबद्दल आकर्षणही वाटत असे. पण ते आकर्षण जरा भितीदायकच होते. म्हणजे कॉलेजमध्ये तिच्याबद्दल चर्चा रंगत असे. ती जादूटोणा वगैरे करते असा काही लोकांचा अंदाज होता. पण तिचं कॉलेजमधलं वर्तन अतिशय सभ्य होतं. ती एक चांगली प्राध्यापिका होती. पण सहसा कुणी तिच्या वाटेला जात नसत. आता सविता तिच्या वाटेला गेली होती. सविता किशोरवयीन अतिसुंदर मुलगी. तिचं सौंदर्य शर्वरीच्या मनात तिच्या कॉलेजमधल्या पहिल्या दिवसापासूनच भरलं होतं. तेव्हाच तिने ठरवलं होतं की काही करुन हिला मिळावयचंच. शर्वरी सविताच्या प्रेमात आकंठ बुडाली होती. सविताला स्त्री-पुरुष संबंधाबद्दल आधीपासून घृणा वाटत होती. म्हणून शर्वरीच्या जाळ्यात ती सहजपणे फसली गेली. रोज कॉलेज संपल्यावर दोघं एकत्र शर्वरीच्या घरी जात. गप्पा मारत, मजा करत, टिव्ही बघत आणि शरीर सुखाचा परमोच्च आनंद सुद्धा घेत असत. दोघांनी एकमेकांना वचन दिलं की काहीही झालं तरी एकमेकांना सोडून जायचं नाही. या दुष्ट दुनियेत त्याचं एकमेकांशिवाय कुणीच नाही, अशी धारणा दोघांचीही झाली होती.
पण हळू हळू सविताला शर्वरीचा कंटाळा येऊ लागला. कारण ती स्त्री कमी आणि पुरुषच जास्त होती. शय्येवर सविता स्त्री आणि शर्वरी पुरुष अशी भूमिका ते निभवायचे. पण सविताला पुरुषांची घृणा वाटत होती. दुसरं कारण म्हणजे शर्वरीचं विचित्र आणि विक्षिप्त वागणं. ती जादू टोणा करीत असे अशी चर्चा कॉलेजमध्ये रंगत होती, ते अगदी खरे होते. तिने अमर होण्यासाठी प्राण्यांची बळी दिली होती. पण तिच्या तंत्रानुसार आता तिला माणसांचा बळी हवा होता. सविताला त्रास देणार्याचा तिने काही दिवसांपूर्वी बळी दिला आहे, हे जेव्हा सविताला कळलं तेव्हा तिला प्रचंड मोठा धक्का बसला. तिला आता शर्वरीपासून दूर जायचं होतं. पण शर्वरी तिला सोडायला तयार नव्हती. शर्वरी सविताला धमकावू लागली... सविताला कळेना की काय करायचं. याच दरम्यान पोलिस "त्या" मुलाचा शोध घेत होते आणि शोध घेता घेता ते शर्वरीपर्यंत येऊन पोहोचले. शर्वरीने अमर होण्यासाठी त्याचा बळी दिला हे जेव्हा पोलिसांना कळले तेव्हा त्यांनाही धक्का बसला. सविताने कधी नव्हे ते आपल्या आईसमोर आपलं मन मोकळ केलं. सविताच्या आईनेही तिला यातून बाहेर पडण्यासाठी मदत केली. सविता समोर आपल्या चुकांबद्दल तिने माफी मागितली व तिला समजवून सांगितले की "मी जे काही केले ते तुझ्या भल्यासाठी केले. तुला कशाची कमी पडू नये म्हणून केलं. माझं शिक्षण झालं नाही. नवरा अगदी तारुण्यात सोडून गेला. पदरात तू होतीस. माझ्यात कोणतेही गुण नव्हते. होतं ते केवळ सौंदर्य.
सविताला आपल्या आईचं म्हणणं पटू लागलं. हळू हळू पुरुषांबद्दलची तिची घृणा कमी होऊ लागली. मानसोपचार तज्ज्ञाच्या मदतीने ती यातून बाहेर पडली. त्याआधी काही विचित्र घटना तिच्या आयुष्यात घडून गेल्या होत्या. म्हणजे तिने शर्वरीच्या विरोधात कोर्टात साक्ष दिली होती. शर्वरी मात्र कोर्टात सविताकडे एकटक पाहत होती. तिचं सवितावर मनापासून प्रेम होतं. ती भयंकर विचित्र होती हे खरंय. पण तिचं प्रेमही खरं होतं. शर्वरीला जन्मठेपेची शिक्षा झाली होती. पण शर्वरीने काही दिवसांतच तुरुंगात आत्महत्या केली. सविता आता मूळ प्रवाहात येऊ लागली. शर्वरी हे पान तिने आपल्या आयुष्याच्या पुस्ताकातून कधीच फाडून चुरगळून फेकून दिलं होतं. ती आता नॉर्मल झाली होती. नॉर्मल मुली प्रमाणे तिचं लग्न झालं अनूज सातारकर सोबत. त्यांचा प्रेम विवाह. अनूज हा अतिशय भला माणूस. त्यांचा संसारही सुखाचा होता. त्यांना एक गोड गोंडस मुलगी झाली, शाल्मली.
तर आता आपण आपल्या मूळ कथेकडे वळूया. शाल्मलीने अनूज सातारकरचा म्हणजेच स्वतःच्याच वडीलांचा खून केला होता. अतिशय विक्षिप्तपणे... पण का? कारण सविताने जरी आपलं वचन मोडलं असलं तरी शर्वरीने आपलं वचन मोडलं नव्हतंच. तुम्हाला आठवतंय ना? दोघांनी एकमेकांना वचन दिलं होतं की काहीही झालं तरी एकमेकांना सोडून जायचं नाही. या दुष्ट दुनियेत त्याचं एकमेकांशिवाय कुणीच नाही. शर्वरीने मृत्यूनंतरही ते वचन पाळलं होतं. तिच्या आणि सविताच्या मध्ये येणार्या कुणालाही ती जीवंत सोडणार नव्हती. ती जादू टोणा करणारी एक भयानक चेटकीण "होती"... सॉरी... म्हणजे "आहे"...
ब्लॉग कसा वाटला हे कंमेंट द्वारे कळवा 🙏
Comments
Post a Comment