“अतृप्त आत्मा “ गावाकडच्या भुताच्या गोष्टी

“अतृप्त आत्मा “  गावाकडच्या भुताच्या गोष्टी Marathi Suspense Stories


रुपाली…!! खूप आवडायची मला. ते वयच तसं होत अन ती होतीच इतकी सुंदर कि मला काय, आख्ख्या वर्गाला ती आवडायची. आवडण्यासारखीच होती ती काळेभोर डोळे, जणू प्रेमाचा अथांग डोह. एक वेगळच तेज असायचं त्या डोळ्यांत.
लांब सडक केस..!! तीनं त्यांना जणू वाऱ्यावर सोडून दिलं असावं, तरीही ते बिचारे, तिच्याशी ईमान राखून असायचे.सरळसोट, सिल्की आणि शाईन,चेहर्यावर पुढं पुढं करणार्या बटा…!! आपल्या नाजूक हातांनी त्या सावरण्यात, तीचे दिवसातले चोवीस ताससुद्धा खर्ची पडत.
लांब नाक…! गोरा रंग…! आणि प्रसन्न चेहरा…!! सदैव ओळखीचं हसू दाखवणारा, नाईन्टीजमधली नीलम आठवतेय का हो तुम्हाला बस..!! अगदी तशीच दिसायची.


तिच्या या मोहक अदांनी साहजिकच त्यावेळी चिपळूणमध्ये हार्ट पेशंटची संख्या वाढलेली होती, तरीही.. तिची अन माझी ओळख, निदान तोंडओळख तरी रहायला हवी.
अर्थात याउप्पर मला दुसरं काही परवडण्यासारखंही नव्हतं म्हणा.
खरं तर आम्ही त्यांचे भाडेकरू. नव्या भैरीच्या पल्याड, त्यांचा एक मोठ्ठा बंगला होता. ant मागच्या बाजूला आऊटहाऊसमधे दोन खोल्या, तिथेच रहायचो आम्ही.मी, माझा धाकटा भाऊ चिनू अन आई बाबा… बाबा गणपती कारखान्यात काम करायचे तर आई चार घरच्या पोळ्या …परिस्थिती बेताचीच.
मी रुपाली दोघंही दहावीत तर चिन्या आठवीत,रुपालीच्या वडिलांचं, चिंच नाक्यावर मोठं किराणा मालाचं दुकान होते आठ-दहा माणसं दुकानात कामाला असायची त्यांच्याकडे. रुपाली अन तिचे आई बाबा, मोठ्ठ्या बंगल्यात तिघंच रहायचे. पहायला गेले तर तिचे आई बाबा खरंच खूप प्रेमळ. अगदी “डाऊन टू अर्थ” म्हणतात न अगदी तसे.शाळेला उन्हाळ्याची सुट्टी लागली की, मी त्यांच्या दुकानात जायचो, हिशेबाच्या वह्या लिहायला.माझं अक्षर चांगलं सोबत गणितही चांगलं होतं. म्हणून निशाच्या बाबांनीच हे काम दिलेलं.आज जवळपास २ वर्ष झाली असतील सुट्टीत हे काम करायचो यातून माझ्या वर्षभराचा वह्यापुस्तकांचा खर्च सुटायचा.रुपालीच्याच्या बाबांना माझं खूप कौतुक वाटायचं, पाठ थोपटून ते नेहमी म्हणायचे. ” खूप शीक.मोठा हो.. आभाळाएव्हडा ..!!”
रुपाली…हं..
पहिल्यांदा खरंच आवडायची…नंतर मात्र…हळूहळू तीचा स्वभाव कळत गेला.

अन् एकदम आवडतीची नावडती झाली कारण ती फक्त दिसायलाच सुंदर होती तिच्या वागण्या बोलण्यात एक माज होता… गर्व होता.
आपलेपणा..?? तो तर कधीच नाही पण नाही तिथे हक्क गाजवायची सवय…गृहित धरायची.
मी घरात नसलो तरी..बिनधास्त माझ्या होमवर्कच्या वह्या घेवून जायची… अन परत आणायच्या वेळी ..छे ! छे ! तिने त्या कधी आणून दिल्याच नाहीत, गरज पडली कि मलाच जावं लागायचं.
आत्ता वाटतं, ती हे मुद्दाम करायची…तशी अभ्यासात बेताचीच…कधीकधी जोमेट्रीच्या डिफीकल्टीज घेवून यायची. मी समजावून सांगायचो, पण तीच त्याकडे लक्षच नसायचं माझा वेळ फुकट खर्ची पडायचा.

येता जाता अंगचटीला येणं…म्हणलं तर सहज धक्का लागायचा…की जाणून बुजून.??डोकं भणभणायला लागायचं,अस्वस्थ व्हायचो,ज्वालामुखीच्या तोंडावर बसल्यासारखं वाटायचं.अभ्यासातून लक्ष ऊडायच्या बेतात.थोडक्यात ती माझ्या मागे लागलेली. अन मी ऊद्ध्वस्त होण्याच्या बेतात….मी स्वतःला पटकन सावरलं.अन शाळेतल्या निसरगंड सरांकडे, संध्याकाळचं जायला लागलो. रात्री दहा वाजेपर्यंत. छान अभ्यास व्हायचा. अन मुख्य म्हणजे या रूपादेवींच्या तावडीतून सुटलो.हल्ली रुपालीदिसली, की फुसफुसायची… चिडायची. एकदा तर तिने डायरेक्ट विचारलं.” मला टाळतोयस का आजकाल ?”
वर्गातली पोरं मला वेड्यात काढायची, पण आता मला फक्त बोर्डाची परीक्षा दिसत होती.परीक्षा झाली… रिझल्ट लागला… अगदी मनासारखा लागला …मी शाळेत दुसरा.आई बाबा खूष…. निशाच म्हणाल तर …रुपालीकशीबशी पास.पुढं काय करायचं ? खरं तर काहीच परवडण्यासारखं नव्हतं, पुन्हा निशाचेच बाबा मदतीला धावून आले.


“माझा मित्र आहे कराडला…शहा नावाचा… तिथ त्याचंही मोठ्ठं किराणा मालाचं दुकान आहे, तिथल्या वाय. सी. कॉलेजमधे अॅडमिशन घे. कॉलेज सांभाळून, त्याच्या दुकानात काम कर. तो जेवन खाण्याची सोय करेल…मी चिठ्ठी देतो.”
देव पावला…!! सायन्स परवडण्यासारखं नव्हतंच. म्हणून कॉमर्स घेतलं… दुकानाचं काम सांभाळून, बारावी झालो. तेही कॉलेजमधे पहिला….!! शहा शेटजी खूष झाले, म्हणाले, तू “सी.ए.” ची तयारी कर. मी फी भरतो. मीही तयार झालो, पण एका अटीवर कि हे पैसे कर्ज म्हणून घेणार अन तिथंच बी. कॉमला अॅडमीशन घेतली. तोवर चिनूचीही दहावी झाली होती. मग मी आई, बाबा, चिनू सगळ्यांनाच कराडमधे बोलवून घेतलं. आता बाबा शेटजींच्या दुकानात काम करू लागले, आईलाही एका साड्यांच्या दुकानात काम मिळालं. तर चिनूने अकरावी सायन्सला अॅडमीशन घेतली. चिपळूण सुटलं ते सुटलंच…!!


मी एका सी. ए. फर्ममधे पार्टटाईम जॉब पकडला,बी. कॉम झालो. पुढे अभ्यास करतच होतो. बघता बघता…मी खरंच सी. ए. झालो सुद्धा..!!
बाबा म्हणाले, पेढे घेवून चिपळूणास जा, रुपालीच्या आईबाबांना भेट …तसा मी चिपळूणात गेलो … त्यांना भेटलो, पाया पडलो, मनापासून आभार मानले. त्यांना खरंच आनंद झाला. रुपाली.. ? पण तिच्या मनात काय चाललं होतं कुणास ठावूक ?
धड एक शब्द बोलली नाही. … ती पण कशी बशी बी. ए. झालेली.
परत आलो. पुण्याहून एका कंपनीतून कॉल आलेला. लगेच जॉईन झालो. आता  चिनूचंही बी. एस्सी झालं होतं. आम्ही पुण्यात भाड्याची जागा घेतली. चिनूनं युनीव्हरसीटीत एम. एस्सीला अॅडमिशन घेतली, कराड सोडताना शेटजींच्या पाया पडलो अन त्यांचे पैसे परत केले. तेच पैसे पाकीटात घालून त्यांनी मला परत केले अन म्हणाले, ” हे नवीन कर्ज, अनुभवासाठी नोकरी कर… पण पुण्यात तुझी स्वतःची फर्म झाली पाहिजे अन त्यासाठी हे टोकन म्हणून वापर….अजून एक, रुपालीच्या बाबांनी एक विचारायला सांगितलंय.


त्यांची.. खरं म्हणजे, रुपालीचीच खूप ईच्छा आहे, “तुला त्यांचा जावई होण्यात ईन्टरेस्ट आहे काय?” घाई गडबड नाही… अन ऊपकारांचं ओझं बाळगू नकोस… आयुष्य तुझ आहे तेव्हा नीट विचार करून सांग.”आता रुपाली मला आठवली, रुपालीपेक्षा तिचा स्वभाव आठवला….चाचरत मी “नाही” म्हणून सांगितलं.विषय संपला होता…मी आता हे सगळं विसरलो.
माझा पुण्यात जम बसला, तीन वर्षात नवी पेठेत स्वतःची फर्म चालू केली. एकदा शेटजीही आले होते कराडहून.मागच्याच वर्षी माझ लग्न झालं, माझी बायको तीसुद्धा सी. ए. आहे. चिनू आता “पी एच.डी” झाला अन तेसुद्धा मॅथेमॅटिक्समधे, सोबतच नेट सुद्धा पास झाला अन आता चिपळूणच्याच डी.बी.जे. कॉलेजमध्ये प्रोफेसर आहे..दोन वर्ष झाली., तिथंच आहे.. तिथ त्यान आत्ता नवीन घर बांधलंय, त्याचही त्याचंही लग्न झालंय”
त्याच्याच वास्तुशांतीला जायचंय पुढच्या आठवड्यात, आई बाबा म्हणतात आता चिपळूणातच राहणार..जेव्हा चिपळूणमध्ये आलो तेव्हा जाणवलं इथे आता सगळ बदललंय, नवा भैरीसुद्धा आता खूप जुना झालाय त्याच्याच पलीकडे…. आमच्या चिन्याचं घर…!! भारीच.
तीन बेडरूम्स,किचन डायनिंग,भोवती मस्त अंगण, अस मस्त घर बांधलाय पठ्ठ्याने.!! खरं तर इथलं, आता काहीच ओळखू येत नाहीये, इथंच कुठं तरी आम्ही..
रुपाली..! मी फ्लॅशबॅकचे दरवाजे ऊघडण्याआधीच बंद केले, वास्तुशांत छानच पार पडली.मी आणि किमया, माझी बायको… वरच्या बेडरूममधे झोपलो, प्रवासाने खरं तर खूप दमलेलो. आडवा होतच झोप लागली.पण अचानक …!! एकदम जागा झालो, किमयानं मला खर्रकन ओढून घेतलेलं. … मला कळेना…!! एकदम काय झालं हिला ? नाईटलॅम्पच्या ऊजेडात तिचे डोळे लकाकले.एल. ई. डी. सारखे. ..!!


मोकळे सोडलेले तिचे केस, चेहरा अधून मधून झाकणारे…तिच्या डोळ्यात काही तरी वेगळंच होत.दिसत होती ती अतृप्ती… हव्यास… वासना…अंगात दहा हत्तीचं बळ आलेलं…कुठला तरी हिशोब चुकता करण्याच्या ईराद्यानं, ती मला त्या कुशीवर खेचत होती. ती माझी किमया नव्हतीच. खाडकन् माझे डोळे ऊघडले.

भास….!! पण भास नव्हता तो, फिदी फिदी हसणारी, हो ती होती ती …!!! तीच ती….!! रुपाली….!!! मी ओळखली तिला, हादरलो…! अंगाला दरदरून घाम फुटला, ” मला माहिती होतं. तू येशीलच एक न एक दिवस, तुझीच वाट बघत होते मी..आज तृप्त होणारेय मी”

माझ्याच कानात घुमणारा तो कानठळी आवाज… मी थरथरायला लागलो.किमयाला गदागदा हलवली. ती भानावर आली, नेहमीसारखी दिसली, मी घामानं आंघोळलेलो..तिला काही कळेना. म्हणलं, तू झोप.रात्रभर काय झोप आलीच नाही, सकाळी ऊठलो अन तडक भैरीच्या देवळापाशी गेलो. तिथ जवळपास चौकशी केली….चिन्याची जागा… निशाचं घर होतं तिथच, त्याच जागेवर चिन्याचं घर बांधल होत.
निशानं त्या घरातचं जीव दिला….तिला वाटलं असणार, मी हो म्हणेनच, पराभव पचवता येत नाही तिला.तिचे आई बाबा घरं दार विकून, कुठतरी दुसरीकडे निघून गेले कायमचे. पडीक होती ती जागा चार पाच वर्ष. ते जुनं घर पाडून चिन्याचं घर ऊभं राहिलेलं. तरीही रुपाली आहेच अजून इथं…माझा दोन दिवस मुक्काम अजून होता. .. आता माझी खात्री होती.

आज रुपाली पुन्हा येणार…!! तसंच झालं.

ती आली… मी तयारच होतो, तीच्या त्या भयाण लालसी चेहर्याकडे न घाबरता बघितलं. तिच्या बटणांसारख्या डोळ्यांना डोळे भिडवून…! ” मेलीस तरी बदलली नाहीस अजून, तुझ्यावर प्रेम करावं, अशी तू कधीच नव्हतीस. तेव्हाही आणि आत्ताही.आता मला भीती वाटत नाहीये तुझी… पण कीव करावीशी वाटत्येय.”

देवानं ईतकं सुंदर रूप दिलं होतं तुला पण स्वभावापायी कचरा केलास त्याचा, ही वास्तू सोडून निघून जा.मी माझ्या जगात सुखी आहे, माझं सोड, तुझं जर माझ्यावर खरंच प्रेम असेल, तर निघून जा.


प्रेमाची पहिली पायरी त्याग असते…तो करायला शीक,.” किमयाचा चेहरा अंधारात चकाकला. तिथं रुपाली दिसली, क्षणभरच ..! गोड हसली, मनापासून, गालावर एक नंतर नुसता खिडकीचा पडदा हलला, अन सगळ काही शांत झालं दुसर्या दिवशी किमयानं हलवून जागं केलं.


” काय चाललं होतं गेले दोन दिवस? काय वेड्यासारखं बरळत होतास ? कोण ही रुपाली?

तुझ्यासाठी जीव वगैरे दिला होता की काय तिनं ?” काल रात्रीपेक्षा मी आत्ता घाबरलो. रुपालीखरंच आली होती का ? मला भास झाले असणार, काय कळेना.

“चिन्या , मी जातो आज परत पुण्याला.” सी. ए. असल्याचा माज ऊतरलाय पार,काय हिशोब चुकतोय, कळत नाहीये…

-कौस्तुभ केळकर नगरवाला.

ब्लॉग कसा वाटला हे कंमेंट द्वारे कळवा 🙏





Comments

Post a Comment

Popular posts from this blog

एक होती चेटकीण...

भुतांच्या सत्यकथा - मामाचा वाडा

एक सत्य घटना : Marathi Bhay Katha