एक डाव भुताचा : Kokan Marathi Ghost Story

एक डाव भुताचा : Kokan Marathi Ghost Story





" किती येळ लावतेस झालच नाही का तूय सामान बांधून, तिथं काय जनमभर नाही राहायचं&nbspआपल्याले" सुभाष सामानाची गाठोडी बैलगाडीत टाकत कावेरीला बोलत होता. " गडबड काहून करून राहिले बरं तुम्ही, काही चिजवस्तू ईसरली म्हणजे त्या रानात काय करायचं" कावेरी तिच्या नवऱ्याला सुभाषला हातातलं काम थांबवून कमरेवर हात ठेवून बोलत होती. कावेरी आणि सुभाषचं वर्षभरापूर्वीच लग्न झालं होतं. परिस्थिती बेताचीच होती. शेतमजुरी करून दोघे संसाराचा गाडा हाकत होते. गावात काम मिळायचं पण कामाच्या बदल्यात त्याला मोबदला पुरेसा मिळत नव्हता. बाराही महिने पैशांची चणचण भासत होती. कावेरी तशी काटकसरी होती. वायफळ खर्च करायला तिला आवडत नसे. चटणी भाकर खाऊन ती भविष्याचे स्वप्न रंगवत होती. सुभाष पण कष्ट करायला कुठे कमी पडत नव्हता. त्याला मुंबईला कामाला जायचं होतं. मुंबईला वर्षभर काम करून बऱ्यापैकी पैसा मिळवता येईल असं त्याच्या डोक्यात होतं. त्याने त्याचा मनसुबा कावेरीला बोलुन सुद्धा दाखवला. पण कावेरीला काय ते आवडले नाही. तिने स्पष्ट नकार दिला. तिला दिवस गेले होते. चार महिन्यांची गरोदर होती ती. अशा परिस्थितीत पैशापेक्षा नवरा जवळ असणे जास्त महत्त्वाचे होते. म्हणून तिने स्पष्ट नकार दिला.
सुभाषला कावेरी गरोदर असल्याची कल्पना होती. म्हणून तर त्याची चिंता वाढली होती. बाळंतपणाचा खर्च, होणार्‍या बाळाचा दवा औषधीचा खर्च गावात काम करून भागणार नव्हता म्हणून त्याला मुंबईला जायचं होतं. पण आता कावेरीने नकार दिला तर तोही मार्ग बंद झाला. त्याला काय करावं सुचत नव्हतं. गावात शेतमजुरी करून पुरेसा पैसा मिळत नव्हता. घरी शेती नसल्याने परिस्थिती फारच बिकट होती. सगळ्या गोष्टी विकत घ्याव्या लागत होत्या. सगळ्याच गोष्टी विकत घ्यायचा तर पैसा तरी कुठवर पुरणार आहे. त्याच्या जीवाची तगमग सुरू होती. कावेरी वर त्याचा खूप जीव होता. काही जरी झालं तरी कावेरीचं बाळांतपण त्याला दवाखान्यातच करायचं होतं. आणि दवाखान्याच्या खर्चाच्या तरतुदीसाठी त्याला पैसे जमवायचे होते. एक दिवस तो संध्याकाळी पैशांच्या तरतुदीचा विचार करत ग्रामपंचायतीच्या ओट्यावर बसला होता. बराच वेळ झाला तो एकाच जागेवर बसून होता. कोणताच मार्ग सापडत नव्हता. तो बसल्याजागी बटव्यातील तंबाखू हातावर घेऊन तिला चुना लावत मळत बसला होता. तेवढ्यात तिथे गजानन आला. गजानन हा सुभाष चा मित्र होता. दोघे पण सोबतच कामाला जात होते. सुभाषने गजानन ला त्याची अडचण बोलून दाखवली. त्याने एक पर्याय सांगितला. शेजारच्या गावात एका इसमाची वीस एकर शेती आहे. तो माणूस सरकारी नोकरदार आहे. तो नोकरीसाठी पुण्याला असतो. तो त्याचे शेत लोकांना अर्ध्या हिस्याने करायला देतो. शेतीचा खर्च तो साहेबच करणार. फक्त आपल्याला सगळी मेहनत करायची. पेरणी, खुरपणी, फवारणी, काढणी सगळं काम आपण करायचं आणि जे उत्पन्न होईल त्याच्यातला निम्मा हिस्सा आपल्याला मिळणार.
त्या साहेबाचं शेतात तीन खोल्यांचे घर आहे. पण त्याचं शेत कोणीच करत नाही. गेल्या तीन-चार वर्षापासून त्याचं शेत पडीकच आहे. तिथे एक जोडपं कामाला होतं म्हणे. पण त्यांचा अकस्मात मृत्यू झाला. त्या गावातले लोक सांगतात तिथे भूत आहे. ती जागा ते शेत झपाटलेलआहे.
गावातील लोक दिवसा सुद्धा त्या शेतातून जात नाहीत. लोकांना चित्रविचित्र आवाज येतात म्हणे. अमावस्याला तर तिथे भयंकर भीतीदायक आवाज येतात. बऱ्याच लोकांना तिथे भुताची बाधा झाली असे म्हणतात. कितीतरी लोकांना अमावस्येच्या रात्री त्या शेतातल्या घरावर एक आकृती बसलेली दिसते.
गजानन ने मार्ग तर सुचवला पण समस्या काय आहे ते पण सांगितलं. ते शेत झपाटलेला आहे. तिथे भूत आहे, लोकांना चित्र विचित्र आवाज येतात, बऱ्याच लोकांना ते भूत दिसलं सुद्धा असं त्याने सगळं वर्णन करून सांगितलं. सुभाषचा तसा भुताखेतांवर विश्वास नव्हताच. त्याने ही गोष्ट कावेरीच्या कानावर घालायची ठरवली. फक्त कष्ट करून उत्पन्नाचा अर्धा हिस्सा मिळत असेल तर काय हरकत आहे. आपल्या सगळ्या गरजा भागून बराच पैसा शिल्लक राहील. सुभाष ने गजाननला अधिक माहिती विचारायची होती म्हणून त्याला तंबाखूचा विडा मळुन दिला.
गजानन सांगत होता काही लोक असं पण बोलतात. त्या साहेबांची शेती त्याच्या चुलत भावाला पाहिजे म्हणून तो असं लोकांना भुतांची भीती दाखवतो. म्हणजे त्या शेतात कुणी काम करायला आलं नाही तर कमी पैशात त्याला ती शेती ती विकत घेता येणार होती. आता खरं काय आणि खोटं काय देवालाच माहिती. गजानन ने सगळी माहिती पुरवली. सुभाषला ती चुलत भावाची भुताची भीती लोकांना दाखवायची, ही माहिती खरी वाटली आणि त्याने ते शेत करायचा निर्णय घेतला.
कावेरी तर अगोदर नाहीच म्हणत होती. कशाला जाणून विषाची परीक्षा करायची. पण सुभाषने तिला पटवून दिलं; तिथे भूत वगैरे काही नाही. हा सगळा त्या साहेबाच्या चुलत भावाचा बनाव आहे. त्याला ते शेत कमी पैशात गिळायचं म्हणून तिथे भुताटकी असल्याचा बनाव करून लोकांना सांगत आहे. हा सगळा त्याचा डाव आहे. नाही हो करतं शेवटी कावेरी तयार झाली. आणि दोघे पण आता त्या शेतात राहायला जाणार होते. सगळ्या चीजवस्तू सामानाची बांधबुंध करून सगळं सामान बैलगाडीत भरणं सुरू होतं.
"कावेरी त्या कोंबड्या डाल्यात बंद करून ते डालं गाडी ठेव, तवर म्या हे गव्हाचं पोतं बांधून घेतो" सुभाष कावेरीला बघत बोलत होता.
"अरे सुभाष झाली का नाय तयारी निघायची, आवरा पटापटा उन्हाच्या आधी तिथे पोहोचलो पाहिजे, म्या बैलांना पाणी पाजून आणतो तोवर आवरा तुमचं"; गजानन गाडीला बांधलेल्या बैलांना मोकळं करीत बोलत होता. गजानन त्यांना सोडवायला जाणार होता. बैलगाडी पण गजानन ची होती. मित्राला आपल्याकडून शक्य तेवढी मदत करायची म्हणून तो हे सगळं करत होता.
"झालं बाबा समधं; ह्या कोंबड्या आणि गव्हाचं पोतं गाडीत टाकलं की झालं; तू ये बैलांना पाणी पाजून" सुभाष गव्हाचं होतं गाडीत टाकत बोलत होता. कावेरीने सगळं सामान गाडीत भरलं होतं. कोंबड्या डाल्यात टाकून त्याला झाकण लावून ते डालं गाडीत ठेवलं. उभं राहत तिने सगळीकडे नजर फिरवली, काही विसरत तर नाही ना याची खातरजमा करून घेतली. सुभाष ने घराला कुलूप लावलं. गजानन ने बैलांना गाडीला जुंपलं. कावेरी बैलगाडीत बसली होती. गजानन गाडी हाकीत होता आणि सुभाष बैलगाडीच्या मागे मागे चालत होता.
बैलगाडीत बरंच सामान आणि कावेरी गरोदर असल्यामुळे गजानन गाडी हळूहळू हाकीत होता. सुभाष बैलगाडीच्या मागे मागे चाकोरी ने चालत होता. रस्त्याच्या दुतर्फा झाडं असल्यामुळे उन्हाचा तडाखा जाणवत नव्हता. कावेरीला आता नवीन जागेवर नव्याने संसार थाटायचा होता. नवीन जागेवर राहायला जायचं म्हणून कावेरीच्या मनाला हुरहुर लागली होती. शेतातच राहायचं होतं. आजूबाजूला दूर दूर पर्यंत लोकवस्ती नव्हती. गावकुसापासून शेत बरंच दूर होतं; काही अडचण आली तर दोघांशिवाय तिसरा कुणी मदतीला नव्हता. काही लोक म्हणतात ती जागा झपाटलेली आहे. भुतांचा वावर असतो म्हणे तिथे. कावेरी मनातून धास्तावली होती.
मजल दर मजल करत ते एकदाचे पोहचले. सूर्य मावळतीला गेला होता. कावेरीने सगळीकडे एक नजर फिरवली. सगळीकडे भयान आणि भकास दिसत होते. शेतातला घर तर खूपच भयानक दिसत होतं. सगळ्या घराला जाळ्या लागल्या होत्या. कितीतरी वर्षापासून ते घर बंद होतं. घराच्या थोड्या अंतरावर एक विहीर होती. पिण्याच्या पाण्याची चिंता नव्हती. घराच्या मागे पूर्णपणे वाळलेलं चिंचेच झाड होतं. झाडाला एक पण पानं नव्हतं. वाळलेल्या झाडाच्या फांद्या भयंकर राक्षसा प्रमाणे भासत होत्या. त्या झाडाला बघुन तर का घरीच या मनाला धडकीच भरली. सुभाष गाडीतील सामान खाली उतरत होता. गजानन पण त्याला मदत करत होता.
कावेरी थोडेफार सामान डोक्यावर घेऊन त्या घराजवळ गेली. डोक्यावरचं सामान तिने खाली उतरवलं. भीतभीतच कावेरीने घराचा दरवाजा उघडला. जसा दरवाजा उघडला तसं काहीतरी मानवी आकृती सारखं तिच्या शरीरातून आरपार गेलं. उग्र दर्प नाकात गेला होता. कावेरी झपाट्याने घराच्या बाहेर पडली. कावेरीचं सगळं अंग थरथरत होतं. उभ्या अंगाला घाम फुटला होता. तोंडातून शब्द फुटत नव्हता. ती घाईघाईने बैलगाडी जवळ आली. सुभाषला कावेरी घाबरल्याचे लक्षात आले. त्याने थोडेफार सामान हातात घेऊन घरात प्रवेश केला. घरात उग्र दर्प येत होता. सगळ्या घरात जाळ्या लागल्या होत्या. कावेरी आणि गजानन पण थोडं थोडं सामान घेऊन घरात आले.
"समदं घर साफ करून घ्यायले पाहिजे, घर लय दिवसाचं बंद हाय वाटते वहिनी" गजानन घराची अवस्था बघून कावेरीला बोलत होता. " हो ना भाऊजी, माया बंदा दिवस जाणार हाय हे घर साफ करायले" कावेरी कपाळावर आठ्या पाडत बोलत होती. "बरं आवरा बा बिगीनं, मले पण पण घरी जायचं हाय, लय उशीर होईन मले तर आज आज घरी जायाले" गजानन सुभाष कडे बघत बोलत होता.
"भैताड हायस का बे लेका तू, काय बी म्हणू रायला, आता रातच्याले घरी जाणार आहेस का लेका? उद्या पहाट जाय. रातच्याले मस्त कोंबडी कापू, लय मदत झाली बा तूयी आम्हाले" सुभाषने त्याचा नकार दर्शवला.
" नाही ना बा घरी तर जायलेच लागीन आज, माही म्हातारी वाट पाहत असेल ना, माया लेक घरी नाही आला म्हुन, माही म्हातारी समद्या गावाले झोपू देणार नाही ना बा" गजानन जोरात हसून; बोलत होता. " तुया म्हातारीले माहित हाय न बे, तू माया संगट आला म्हुन, तु माया संगट असला की तुया म्हातारीला काय घोर नसते न बे तुया. आज रातच्याले मस्त मटण खाऊ न बे लेका" सुभाष मिशीवर ताव देत बोलत होता.
सुभाष आणि गजानन बैलगाडी तील सामान खाली करत होते. बैलांना खुट्याला बांधून त्यांना खायला वैरण घातली होती. बैल माना हलवत, गळ्यातल्या घंटा वाजवत ते गवत खात होते. कावेरी हातात झाडू घेऊन सगळं घर साफ करीत होती. बैलगाडी तील सगळं सामान घरात आणून झालं होतं. आता अंधार चांगलाच गडद झाला होता. सुभाष मडकं घेऊन विहिरीवर पाणी आणायला गेला होता. कावेरीने स्वयंपाकासाठी गाठोड्यातून भांडे तिखट मीठ हळद चटणी पीठ अशी सगळी सामग्री काढून ठेवली; गजानन नी बाहेरून मोठे मोठे चूल मांडण्यासाठी तीन-चार दगड आणले. चुलीत घालायला वाळलेले लाकडं पण घेऊन आला. सुभाष पाणी घेऊन आला होता. "मले काय वाट्टे गज्या आपण मटन तिकडे विहिरीजवळ शिजवू, मस्त जागा हाय तिकडे. तिकडेच कोंबडं कापून शिजवायले टाकू. कावेरी ह्या चुलीवर भाकरी करेल, आपण आपली चूल तिकडेच मांडू. सुभाष गजाननला विचारत होता.
"एकदम बेस होईल गड्या, चल घे तिकडच सगळं सामान आपलं" गजानन सुभाषला टाळी देत बोलला. कावेरीने चूल पेटवून भाकरी टाकायला सुरुवात केली होती. गजानन एक मोठा पितळी गंज आणि मडक्यात थोडसं पाणी घेऊन विहिरीकडे निघाला होता. सुभाषने एक मस्त कोंबडा घेतला आणि कावेरी ला सांगून तो पण; विहिरीकडे गेला. गजानन नी मस्त तीन मोठे दगड लावून चूल तयार केली. चुलीवर पितळी गंज नीट बसते का नाही ते तपासून घेतलं. मग वाळलेले दोन-चार लाकडं चुलीत घालून चुल पेटवली.
सगळीकडे अंधार पसरला होता. सगळीकडे स्मशान शांतता होती. अधून मधून एखादी टिटवी टिव.. टिव.. असा कर्णकर्कश आवाज करत त्या भयान शांततेला भेदत वातावरणाला अजूनच भेसूर करीत होती. दूर कुठेतरी कोल्हेकुई सुरू होती. अधून मधून कुत्र्यांचा भुंकण्याचा आवाज येत होता. त्या वाळलेल्या चिंचेच्या झाडावर वटवाघुळी उलट्या लटकून भेसूर आवाज करीत होत्या. काळजात धडकी भरेल असंच गंभीर आणि भीतीदायक वातावरण होतं.
चुलीतल्या लाकडाने आता चांगलाच पेट घेतला होता. सुभाषने कोंबडीला कापण्यासाठी एक मोठा सुरा आणला होता. कोंबडीला कापायच्या अगोदर तिला थोडं पाणी पाजलं. मग सुभाषने कोंबडीची मान एका हातात धरली आणि दुसऱ्या हाताने सुरा मानेला लावणार तोच कोंबडा एकदम जोरात भेसूर ओरडला. त्या आवाजाने दोघांच्या काळजात धस्स झालं. गजानन चे तर हात पाय लटपटत होते. हृदयाचे ठोके वाढले होते. घशाला कोरड पडली होती. सुभाष सुद्धा मनातून घाबरला होता. अशा भयान वातावरणात असा भेसूर आवाज ऐकून कुणालाही धडकी भरली असती.
सुभाष ने गजानन दादा धीर दिला " काय रे गज्या घाबरला का लेका, आबे ती कोंबडी चाकुले भिली असेल ना ना, म्हणून तर अशी ओरडली नाहीतर कोंबड्या असे विचित्र आवाज काढतात का लेका". गजानन मात्र चांगलाच घाबरला होता. तो काहीच बोलला नाही. त्याच्या मनात भयंकर विचार येत होते. पण सुभाष सोबत असल्यामुळे त्याला जरा धीर येत होता. सुभाषने धारदार चाकू कोंबड्याच्या गळ्याला लावत त्याचा गळा चिरला पण कोंबडा अजिबात ओरडला नाही आणि तडफडला सुद्धा नाही. हा असा विचित्र प्रकार बघून गजानन मात्र खूपच घाबरला होता. आज पर्यंत एवढे कोंबडे कापले होते. पण असा प्रकार कधीच घडला नव्हता. ह्या सगळ्या हालचाली नैसर्गिक नाहीत याची त्याच्या मनाला खात्री पटली होती.
सुभाषने कोंबडीचे बारीक बारीक तुकडे करून घेतले. मग ती कापलेले मांसाचे तुकडे स्वच्छ धुऊन घेतले. त्या मांसाच्या तुकड्यात हळद मीठ टाकून ते एका बाजूला ठेवून दिले. चुलीवर ठेवलेलं गंजातील पाणी आता चांगलीच गरम झालं होतं. सुभाषने हळद मीठ लावलेलं मांस त्या गरम पाण्यात शिजवायला टाकून त्याच्यावर झाकण ठेवून दिलं. थोड्यावेळात ते मांस शिजल्याची खात्री करून तो गंज खाली उतरवून घेतला. बस आता भाजी फोडणी देऊन मस्त जेवण करायचं होतं. सुभाषने कांदा लसूण चटणी मीठ तेल सगळं साहित्य एका ताटात घेतलं. पण मसाला आणायचा तो विसरला होता. " गज्या लेका मसाला तर आणायचा ईसरलो, कावेरीने मसाला काढून ठेवला होता, थांब म्या पळत जाऊन घेऊन येतो. तू बस इथेच" असं बोलत सुभाष झपाट्याने निघून गेला. गजानन मात्र आता चांगलाच घाबरला होता. त्याला एकट्याला तिथे राहायची अजिबात इच्छा नव्हती पण त्याचा नाईलाज झाला. त्याच्या मनाला हुरहूर लागली होती. तेवढ्यात एक टिटवी जोरात टिव टिव टिव टिव.... असा कर्णकर्कश आवाज करत त्याच्या जवळून गेली. गजानन प्रचंड घाबरला होता. त्याने परत चुलीत लाकडं घालून मोठा जाळ केला. त्या जाळाने आता बर्‍यापैकी उजेड झाला होता. तो चुलीजवळ मांडी घालून बसला. मनातील भीती आता थोडी कमी झाली होती. शेजारच्या गंजाकडे त्याचं लक्ष गेलं. शिजलेल्या मटणाच्या वासाने त्याच्या तोंडाला पाणी सुटलं होतं.
गंजावरचे झाकण बाजूला करून गजानन ने एक मांसाचा तुकडा खायला म्हणून हातात घेतला. तो मांसाचा तुकडा त्याने तोंडाजवळ नेला तर पूर्ण हात ओला झाल्याचा त्याला भास झाला. हात कशाने ओला झाला हे बघण्यासाठी त्याने चुलीच्या जाळाच्या उजेडाजवळ हात नेला तर त्याचा पूर्ण हात रक्ताने माखला होता. हातातील मांसाच्या तुकड्यातून रक्ताची धार लागली होती. त्याला नखशिखांत घाम फुटला होता. समोर कशाची तरी हालचाल झाली म्हणून त्याने वर बघितलं तर एक पांढरी मानवी आकृती समोर उभी असल्याची त्याला दिसली. ती आकृती जमिनीपासून थोड्या उंचीवर हवेत तरंगत होती. हे दृश्य बघून गजानन च्या घशाला कोरड पडली. काळजाचे ठोके जोरात वाढले. ती आकृती हळूहळू त्याच्या दिशेने पुढे सरकत होती. गजानन बसल्या जागीच मागे मागे सरकत होता. ती आकृती गजाच्या एकदम समोर आली. गजानन जीव वाचविण्यासाठी धडपड करत होता पण कोणीतरी त्याच्या हात पाय घट्ट आवळून धरले होते. त्या आकृतीने एकदम जोरात त्याच्या अंगावर झडप घातली आणि गजानन ने प्राणातिडकेने एक मोठी आरोळी ठोकली..;

Credit goes to Avinash Jagtap 

Comments

  1. Ardhavat stories ka lihitat mahit nahi

    ReplyDelete
  2. काहीही फालतू स्टोरी. कोंबडी चा जीव घेताना मज्जा वाटते. स्वतःच्या जीवावर बेतल्यावर कशाला रडायचं. इतकी गरिबी असताना संसार थाटायची , पोरं काढायची भारी हौस

    ReplyDelete
  3. फालतू स्टोरी

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

एक होती चेटकीण...

एक सत्य घटना : Marathi Bhay Katha

भुतांच्या सत्यकथा - मामाचा वाडा