असे काय घडले त्या रात्री रोहिणी सोबत...

real ghost stories in marathi

* ती काळरात्र *

Real Ghost Stories in Marathi

ओह ! शीट !! गाडीला पण बंद पडायला आताच मुहूर्त मिळाला. रोहिणी चिडून स्वतःशीच बोलली. 

रोहिणी एका प्रसिद्ध मोठ्या कंपनीत मॅनेजर म्हणून काम करीत होती. एकदम मॉडर्न विचारांची, बिनधास्त २८ -२९ ची तरुणी. स्वतःचा ४ रूम चा प्रशस्त ब्लॉक. आई वडील, लहान भाऊ आणि लहान बहीण गावी राहत होते. गावावरून आईने पाठवली राधा मावशी बरोबर ती राहत होती. मॉडर्न असल्यामुळे दारू, स्मोकिंग पार्ट्या तिला निषिद्ध नव्हते. किंबहुना आवड होती. पब मध्ये जाणे येणे होते.
अशी हि रोहिणी काही अर्जंट कामासाठी मुंबई वरून गावी चाललेली आता चांगलीच वैतागलेली होती. शुक्रवारी रात्री निघून, रविवारी रात्री परत येण्याचा तिचा विचार होता. आता पर्यंत ती अशी बऱ्याच वेळा जाऊन आलेली. तशीच ती आज पण निघाली. पण आज सुरवाती पासूनच तिला नाट लागली. अगं ! आज रात्रीची नको निघूस. आज अमावस्या चालू झाली आहे. उद्या सकाळी निघ. राधामावशी पहिली आडवी आली. काही नाही होत अमावास्येला निघून. सगळे थोतांड आहे. माझा नाही विश्वास, असे म्हणून रोहिणी निघाली. घाई गडबडीत मोबाईल घरी विसरली. परत लिफ्टने वर येऊन मोबाईल घेतला. बाहेर जोरात पाऊस चालू होता. कार चालू करायचा प्रयत्न केला तर,कार चालू होईना. अथक प्रयत्न करून १०- १५ मिनिटांनी कर चालू झाली. एक झोकदार वळण घेत ती सोसायटीच्या गेट जवळ आली, तर गेट बंद. जोर जोरात हॉर्न वाजवून तिने वॉचमन ला बोलाविले. बाथरूमला गेलेला वॉचमन ५ मिनिटांनी आला. सॉरी मेमसाब ! थोडा अर्जंट था. हां हां ठीक है, अभी मेरा थोबाड देखेगा या दरवाजा भी खोलेगा. यूसलेस ! रोहिणी चिडून बोलली. सोसायटी मधून बाहेर पडून ती मेन रोडला लागली. रात्रीची वेळ आणि पाऊस असल्यामुळे रस्त्यावर ट्राफिक नव्हते. आनंदाने तिने स्पीड वाढविला. सुसाट वेगाने ती हायवे ला लागली. 
आणि आता अचानक तिची गाडी गचके देत बंद पडली. जवळ गॅरेज नाही, हॉटेल नाही, कि कोणी माणूस नाही. वाटेत हॉटेल मध्ये खाईन म्हणून राधा मावशीने दिलेला डबा न घेता ती निघाली होती. पण आता कुठेही तिला हॉटेल दिसत नव्हते आणि भूक लागलेली. तशीच मग छत्री व बॅटरी घेऊन ती गाडी मधून उतरली. मुसळधार पावसात ती थोडी चालत राहिली कोणी कुठे दिसते का ते पाहण्या साठी. थोड्या अंतरावर तिला उजेड दिसला. चला काहीतरी मदत मिळेल म्हणून ती जरा वेगाने त्या दिशेला चालू लागली. मुसळधार पाऊस आणि सोसाट्याचा वारा. तिची मुंबईची नाजूक छत्री थोडीच टिकाव धरणार होती. एका जोरदार वाऱ्याने ती उलटी पलटी झाली. आता तिला त्या छत्रीचा काहीच उपयोग नव्हता. चिडून तिने छत्री टाकून दिली आणि त्या दिव्याच्या दिशेने झपाझप चालू लागली. 

एका वडाच्या झाडाच्या पारंब्या चित्र विचित्र आकारात लोंबत होत्या. त्या पारंब्यांच्या तयार झालेल्या आकृत्या मनात भय निर्माण करीत होत्या. त्या झाडा खालून ती पुढे सरकली, आणि अचानक... फुस्सस्स्स करीत तिच्या समोरून एक काळा जनावर नागमोडी वळण घेत तिला आडवा गेलं. एकदम मनात धस्स झाले. एक मिनिट ती तशीच उभी राहिली. मग परत धीर करून चालू लागली. लांबून दिसलेला उजेड एका घरातून येत होता. घरा भोवती तारेचं कंपाऊंड होते. गेट शोधत ती पुढे सरकली. गेट उघडण्या साठी तिने गेट ला हात लावला मात्र... तिला कुठून तरी २-३ कुत्र्यांच्या रडण्याचा आवाज ऐकू आला. ती मनातून थोडी घाबरली. पण सर्व धीर एकवटून तिने गेट ढकलले. कर्रर्रर्रर्रर्रर्र आवाज करीत गेट उघडले गेले. त्या भयाण शांततेत तिला तो आवाज भयानक वाटला. तशीच त्या मातीच्या रस्त्यावरून ती त्या चिखलातून चालू लागली. पचक पचक पचक तिचा चिखलातून चालण्याचा आवाज तिच्याच मनात अजून भीती उत्पन्न करीत होता. १० पावले टाकली नसतील तोच... ती धडपडली. तिचा पाय एका ठिकाणी मातीत रुतला. ब्लडी शीट ! यांना सिमेंटचा रस्ता बनवायला काय होते. त्या घरमालकाला मनातून शिव्या देत तिने पाय बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. जरा जोर लावून पाय काढला तशी, तिची महागडी सॅंडल आतच राहिली आणि नुसताच पाय बाहेर आला. बुलशीट ! म्हणून तिने रागाने दुसरी सॅंडल पण काढून फेकून दिली. आणि ती पुढे निघाली. घराच्या व्हरांड्याजवळ ती आली. चार पायऱ्या चढून ती व्हरांड्यात आली, आणि अचानक...तिथे वळचणीला बसलेलं एक घुबड चित्र- विचित्र आवाज करीत पंख फडकावीत तिच्या डोक्यावरुन दुसऱ्या दिशेला गेले. तिच्या मनात भीतीने घर करावयास सुरवात केली. धैर्य एकवटून ती दाराजवळ कुठे बेल दिसते का पाहावयास लागली. पण कुठेही तिला बेल दिसेना. दरवाजा ढकलून पहिला, तर तो बंद होता. इकडे तिकडे बघताना तिला एक पांढरी शुभ्र दोरी लटकलेली दिसली. तिने ती दोरी जोरात ओढली. ठण् ठण् ठण् करून त्या शांततेत एक प्रचंड आवाज घुमला. तिने दोरी सोडून कानावर हात ठेवले. आणि अचानक कुठेतरी ५-६ कुत्री भुंकण्याचा आवाज तिला आला. पांच मिनिटे झाली तरी कोणी दरवाजा उघडला नाही. तिने परत दोरी ओढण्यासाठी दोरी पकडली, ती दोरी ओढणार तोच... कोण हवय तुम्हाला? तिच्या कानाजवळ एक घोगरा आवाज तिला ऐकू आला. तिने दोरी सोडून जोरात किंकाळी फोडली. आणि तशीच मागे वळाली आणि पाठी उभ्या असलेल्या एका ५०-५२ च्या माणसावर धडपडली. कोणीतरी माणूस आहे हे बघून तिच्या जिवात जीव आला. एवढ्या जवळून बोलतात का? काही मॅनर्स आहेत कि नाही तुम्हाला? माणूस आहे पाहून ती आता भडकली. माफ करा. आम्ही अडाणी माणसं. तुमचे शहरी रिवाज नाही माहित आम्हाला. ठीक आहे. पावसाने चिकटलेल्या तिच्या टीशर्ट आणि टाईट पॅन्ट मधून दिसणाऱ्या तिच्या शरीरा कडे त्याची पाहणारी नजर हटविण्या साठी ती जरा मागे सरकली. माझी गाडी इथे बंद पडली आहे. आजची रात्र मला इथे रहावयास मिळेल का. पाऊस कमी झाला कि मी जाईन. हं ! कुठे जाणार !! इथे येणारा कोणी परत जात नसतो !!! अस्पष्ट असे तो बोलला. काय म्हणालात ? काही नाही, चला आत, म्हणून तिला ओलांडून तो पुढे झाला. त्याने दरवाजा उघडला. विचित्र प्रकारचा आवाज करीत दरवाजा उघडला गेला. अरे ! दरवाजा तर आतून बंद होता, मग ह्याने उघडला कसा. विचार करीत ती दरवाज्यातून पाय आत टाकणार, तोच तिला परत कुत्र्यांच्या रडण्याचा जोरात आवाज येऊ लागला.जणू काही आत जाऊ नकोस असाच इशारा तो आवाज देत होता. तिचा पाय तिथेच थबकला. आत जावे कि नको या संभ्रमात ती असतानाच, आत या लवकर, इथे जनावरे फिरत असतात म्हणून त्याने तिला आत बोलाविले. तिने मनाचा धीर करून आत पाऊल टाकले.

तिने दरवाज्यात उभे राहून, त्या दिवाणखान्याच्या उजेडात जागेचे निरीक्षण करु लागली. २५ बाय २५ चा मोठ्ठा दिवाणखाना होता. कलाकुसर असलेल्या खुर्च्या, मनमोहक झुबरे, कोपऱ्यात पेंढा भरलेले प्राणी, मोठया लाकडी फ्रेमच्या खिडक्या, त्यावर पडदे आणि नागमोडी वळण घेत, लाल रंगाच्या गालिच्याने भरलेल्या वर जाणाऱ्या पायऱ्या. खूपच सुंदर होते. हा माणूस अचानक गायब कुठे झाला, असा ती विचार करत असतानाच, तिकडे बाथरूम आहे, गरम पाण्याने हात पाय धुवून घ्या. मी जेवण करायला घेतो. परत कानाजवळ तोच घोगरा आवाज आला. आता तिने किंकाळी नाही फोडली पण दचकली मात्र. हा माणूस जातो कुठून आणि येतो कुठून तिला काहीच समजत नव्हते. तुम्ही असे पाठीमागून येऊन बोलू नका, ती जरा रागानेच बोलली. माफ करा मला बाईसाहेब. ती बाथरूम कडे जाण्या साठी वळली. टॉवेल आहे नां. तिने पाठी वळत विचारले. तर परत हा गायब. अरे कुठे नाहीसा झाला. तिच्या मनात भीतीने थोडे घर केले होते. 

ती मग तशीच बाथरूम मध्ये शिरली. मुंबई च्या एका स्वयंपाक घर एवढे बाथरूम होते. सर्व सोयीनी सुसज्ज. तिने एक नळ चालू केला तो थंड पाण्याचा होता. मग दुसरा, तिसरा करीत पाचवा नळ गरम पाण्याचा होता. मग तिने गरम पाण्याने हात पाय धुतले. टॉवेल ने हात पुसत ती बाहेर आली. सोफ्यावर डोळे मिटून बसली मात्र, कपडे बदलून घ्या, नाहीतर सर्दी ताप येईल. दचकून तिने डोळे उघडून पहिले तर, एक हँडसम तरुण हातात एक जीन्स आणि टॉप घेऊन उभा होता. हा अचानक आपल्या समोर कसा असा विचार करीत थँक्स म्हणून तिने तो ड्रेस हातात घेतला. आणि ती एकदम दचकली. सेम तिच्या ड्रेस सारखाच तो ड्रेस होता. हा हा ड्रेस ! रोहिणी ने चाचरत विचारले. तुमचाच आहे. शेजारून आवाज आला तशी ती अजूनच दचकली. एक ४५-४६ ची सुस्वरूप दिसणारी बाई शेजारच्या खुर्चीतून बोलली. अरे मगाशी इथे ती नव्हती आणि अशी अचानक कशी इथे आली. मगाशीच गाडी मधून काढून आणला. तुमची गाडी समोरच उभी होती. दरवाजा उघडा होता. मग पाठच्या सीट वरील तुमची बॅग काढली आणि हा ड्रेस घेऊन आलो. तिने खिडकी जवळ जाऊन पहिले तर खरंच तिची गाडी गेट समोर उभी होती. ती विचार करायला लागली, मगाशी मी गाडी बंद पडली तिथपासून बऱ्याच लांब चालत आले तेव्हा हा बंगला दिसला मग आता ती गाडी गेट समोर कशी काय. जास्त विचार नका करू. गरम गरम जेवण जेवून घ्या. निवांत झोप घ्या. तिलाही काही समजेना. ती दमली पण होती, भूक पण लागली होती. मग डायनिंग टेबलावर ते तिघे बसले. समोर आलेले गरमगरम चिकन, भाकरी, भात वाढून ताट तयार होते. रश्याच्या वासाने तिची भूक आणखीनच चाळवली गेली. मस्त आरामात तिने तीन भाकऱ्या भात संपविला. तिने तिला तिची रूम दाखवली. रूम मध्ये गेल्यावर, तिने दरवाजा बंद केला, दोन तीन कड्या होत्या त्या सर्व लावल्या आणि बेड कडे वळली. पहाते तो काय टेबलवर तिच्या ब्रँड चे सिगारेट पाकीट आणि लायटर. जरा नवल करीत तिने सिगारेट पेटविली. गॅलरीत थोड्या वेळ उभी राहून सिगारेट संपविली. मग बेडवर आली. रजईत स्वतःला गुरफटून घेत ती बेड वर आडवी झाली. मग तिच्या मनात एक एक प्रश्न येऊ लागले. सगळी कडे लाईट गेलेले असताना याच बंगल्यात लाईट कसे. एवढ्या लांब उभी असलेली गाडी आता गेट जवळ कशी काय. आपण दरवाजे लॉक करून उतरलो होतो हे तिला पक्के आठवत होते, मग त्यानं मागच्या सीट वरील बॅग कशी काढली. २०-२५ मिनिटात एवढे गरमगरम चिकन, भाकऱ्या, भात कसा काय तयार झाला. आपला सिगारेटचा ब्रँड याला कसा माहिती. आणि त्या प्रश्नांची उत्तरे शोधताना तिला कधी झोप लागली कळलेच नाही.

रात्री कधीतरी तिला बोलण्याच्या आवाजाने जाग आली. वेळ पाहण्यासाठी घड्याळ पहिले तर ते ३ वाजता बंद पडलेले. मोबाईल पहिला तर बॅटरी पूर्ण डाउन. आत काय करायचे. तो आवाज तिला काही स्वस्थ बसू देईना. मनात सर्व धैर्य एकवटून तिने दार उघडले. आणि पॅसेज मध्ये आली. वरून तिला दिवाणखाना दिसत होता. तिने वाकून खाली पहिले तिला काहीच दिसलं नाही. अंधाराला डोळे थोडे सरावल्यावर ती पायऱ्या उतरून खाली आली. मगाशी तिने पाहिलेले सोफा, खुर्च्या ती झुंबरे सर्व काही गायब होते. सगळीकडे जळमटे तिला दिसत होती. एका बाजूच्या खोलीतून आवाज ऐकू येत होता. तिची पावले त्या दिशेनी वळली. दरवाजा अर्धवट लोटलेला होता. तिने तो दरवाजा अजून थोडा उघडला. आणि... येणारी किंकाळी तिने तोंडावर हात ठेवून दाबून धरली. विस्फारित डोळ्यांनी ती आतील दृश्य पाहू लागली. आत २-३ कुंड आगीने पेटलेली होती. त्याच्या समोर ४-५ जण नाचत होते. त्यातील एका कुंडा समोर, विचित्र चेहरा असलेली एक दगडी मूर्ती होती. तिच्या पायाजवळ एका लहान मुलाला माने खाली लहान लाकडी ओंडका ठेवून झोपविलेले होते. तो हँडसम आणि तो दुसरा माणूस त्या मुलाला गुलाल लावीत होते. त्याच्या शरीरावर फुले टाकलेली होती. तो दुसरा माणूस कपाळाला रक्ताचा टिळा लावून काहीतरी अगम्य भाषेत मंत्र म्हणत होता. त्याचा घोगरा आवाज आता टिपेला पोचला होता. त्याने हात वर केला आणि त्या हॅन्डसमला काहीतरी खूण केली, तसे त्याने तेथील एक धारधार मोठा सुरा हातात घेतला, दोन मिनिटांनी त्या माणसाने जसा हात खाली केला, हँडसम ने तो सुरा त्या मुलाच्या मानेवर खाटीका सारखा मारला. एका घावात ती कोवळी मान धडा पासून अलग झाली. तत्क्षणी रोहिणीच्या तोंडातून एक जोरदार किंकाळी बाहेर पडली आणि त्याच वेगात ती दरवाज्याच्या दिशेने धावत सुटली. दरवाजा उघडून बाहेर पडली. कुंपणाचे गेट ओलांडले आणि ती तिथेच मानसिक ताणाने शुद्ध हरपुन खाली पडली. 

शुक शुक... शुक शुक ! अहो बाई !! तिला अस्पष्ट आवाज ऐकू आले. ती जरा शुद्धीवर आली होती. तिने डोळे किलकिले करून पहिले. तिने आजूबाजूला पहिले. पहाटेची वेळ होती. दिवस नुकताच उजाडला होता. तरी थोडा अंधार होताच. दूर तिला एका वाड्याची अस्पष्ट आकृती दिसत होती. पाऊस थांबला होता. तिच्या अंगात घरातून निघतानाचे कपडे होते. तीन चार खेडूत माणसे तारेच्या कंपाऊंड पलीकडून तिला आवाज देत होती. तशी ती उठून त्यांच्या जवळ गेली. हे कोणते ठिकाण आहे. रोहिणीने विचारले. बाई ! हि गावची मसणवट आहे. तिने बाजूला पहिले तर २-३ चिता जळत होत्या. मग तिने त्यांना घडलेली सर्व हकीगत सांगितली.

पोरी ! अगं बऱ्याच वर्षा पूर्वी इथे एक वाडा होता. त्यातील माणसे धनासाठी लहान मुलांचे बळी द्यायचे. म्हणून एक दिवस गावाने त्यांना वाड्या सकट पेटवून दिले. एका मांत्रिकाने तो वाडा कंपाऊंड पर्यंत मंत्रांनी भरून टाकला. त्यामुळे ते वाड्याचा कंपाऊंड बाहेर येऊ शकत नाहीत. त्यांचे आत्मे दर अमावास्येला इथे येतात जर का चुकून कोणी त्यांच्या कंपाऊंड च्या हद्दीत आला तर त्याचा बळी घेतात. पण का कुणास ठाऊक त्यांना वाड्यात नाही मारत, वाड्याच्या बाहेर पण त्यांच्या कंपाऊंड च्या हद्दीत ती माणसे त्यांचा बळी घेतात. चला ! समोर बैलगाडी आहे, तुम्ही बैलगाडीत बसून घ्या. पण माझी गाडी ! आवो पहिल्यांदा गावात जा. मग आमचा हणम्या मेकॅनिकला देतो कि तुमच्या बरोबर गाडी रिपेअर करायला. चला या ! इकडे या !! तिने पाहिले, बैलगाडीत गाडीवान, एक बाई आणि एक पुरुष बसलेले होते. मग थोड्या वाकलेल्या तारा वाकवून, ती तारा ओलांडून त्यांच्या जवळ गेली. बैलगाडीत चढली. त्या माणसांना थँक्स म्हणण्या साठी तिने मागे पहिले, तर ती माणसे तिला कोठेच दिसली नाहीत. अरे ! कुठे गेली हि सर्व. ती बाई गर्भित हसली आणि म्हणाली, त्यांचे काम झाले. ती गेली. तिच्या बोलण्याचा रोहिणी अर्थ लावण्याचा प्रयत्न करीत असताना हवेच्या थंड झोक्याने रोहिणीला डुलकी लागली. जरा वेळाने कसल्याश्या आवाजाने तिला जाग आली. पहाते तो काय...बैलाच्या गळ्यातील घुंगरांचे आवाज येत होते पण...गाडी बैलाविना चालत होती. गाडीवान पण जागेवर दिसत नव्हता. तिच्या छातीत एक हलकीच कळ आली. तिला आता त्या थंड हवेत सुद्धा घाम फुटला होता. गाडी थांबली आणि... तिच्या कानावर मागून तो घोगरा आवाज आला. अजून अमावस्या संपली नाही बाई. आमच्या हद्दीत आलेला कोणीही जिवंत परत जात नाही. तिने मागे वळून पहिले तर तो हँडसम, ती बाई, आणि तो माणूस जोरजोरात हसत होते. त्यांची बैलगाडी त्या पडक्या वाड्या जवळच उभी होती. तु तुझ्या सुदैवाने कंपाऊंड ओलांडून बाहेर गेलेली होतीस. पण दुर्दैव तुझे, पुन्हा आत आलीस. असे म्हणून ती बाई खाली उतरली. आणि रोहिणीला उतरविण्या साठी तिचा हात धरला मात्र... रोहिणीच्या तोंडातून एक जोरदार किंकाळी आली, पण बाहेर पडू शकली नाही. किंकाळी साठी उघडलेल्या तोंडातून किंकाळी ऐवजी तिची प्राणज्योतच बाहेर पडली.

नरेंद्र वेटकोळी 

- पनवेल 

Comments

Popular posts from this blog

एक होती चेटकीण...

भुतांच्या सत्यकथा - मामाचा वाडा

एक सत्य घटना : Marathi Bhay Katha